Skip to main content

तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!!

''तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!!


"काय बे... नाचला का लेका आत्ता...!?"


तो म्हणाला... "नाही...!"


मी म्हणालो... काऊन बे...!? काऊन नाही नाचला...!?


तर ते ७-८ वर्षांचं पोरग म्हणालं... "मी मुसलमान नाही ना...!?"


आत्ता थोड्या वेळापूर्वीचं माझ्या मित्राच्या घराखालून मिरवणूक जात होती. कदाचित मोहरम जवळ आल्यामुळे सवारी घेऊन मिरवणूक वाजत गाजत सवारी बसवायला जात होती. घराखालून मिरवणूक पुढे गेली आणि मी माझ्या घरी परत जायला खाली आलो... आणि वरील प्रसंग घडला.


"थोड्या वेळासाठी काळजात चर्रर्रर्र झालं माझ्या...!!!


आणि मग ह्या गोष्टीचा विचार करत करतचं मी घरी परतलो...


लहाणपणी माझ्याही गावात मोहरम आला की सवारी बसायची. ७-८ वर्षाचाचं असेल मी तेंव्हा... सिंदखेड आणि लिंगमपेठ अशा दोन्ही भागात सवारी बसायची. आणि ती सवारी हमेशा हिंदू व्यक्तीच्याचं घरी बसायची. ह्याचे कारण काय होते हे मला अजूनही माहिती नाही किंवा ते माहिती करून घ्यायचा मी प्रयत्नही कधी केला नाही. गावातील सर्व हिंदू-मुस्लिम आणि बौद्धधर्मीय लोक मिळून ह्या मोहरममध्ये सामील व्हायचे. मी स्वतः बौद्ध असूनही माझ्या आई-वडिलांनी कधीचं सवारीच्या उत्सवात सामील होण्यास मला मज्जाव केला नाही. किंवा कुठे गणपतीला किंवा हनुमान जन्मोत्सवाला जाऊ नको म्हणाले नाही.


माझी सामाजिक पार्श्वभूमी बुद्धिस्ट असल्यामुळे २२ प्रतिज्ञा पाळण्याचा मी प्रयत्न करत असलो तरी इतरांवर मी त्या नाही लादू शकत आणि मी कधी त्या लादल्याही नाही. माझ्या इतर हिंदू-मुस्लिम मित्रांनाही ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं, कारण त्यांना ह्या गोष्टीच कधी माहितीचं नव्हत्या. पण मीही कधी त्यांना ह्या गोष्टी समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्यांनीही कधीचं मला त्यांच्या उत्सवाचं आमंत्रण-निमंत्रण देताना माझ्या नास्तिकतेचा किंवा माझ्या धर्माचा किंवा मी फॉलो करत असलेल्या विचारधारेचा क्षणभरही विचार केला नाही.

आपल्याला जर सुख आणि शांतीने सोबत जगायचे असेल तर आपल्या हद्दीत राहून एकमेकांना समजून घ्यावं लागतं. एकमेकांच्या आदर्शांची अवहेलना न करता एकमेकांचे सुख-दुःख शेअर करावे लागतात. आणि मीही आतापर्यंत हेच करत आलोय. त्यामुळे जोपर्यंत आपल्यामध्ये मतभेद असतात तोपर्यंत आपल्याला त्या मतभेदांसोबत जगायची सवय करावीच लागते.

"लेट्स ऍग्री... टू डिसऍग्री..." ह्यातच आपले सौख्य सामावलेले असते. तुला जे करायचे ते तू कर मित्रा... आणि मला जे करायचे ते मला करू दे. एवढं सोपं आहे. उगाच त्याच्यात धर्म-विचारधारा आणली तर सर्व खोळंबा होऊन बसेल. आणि आपल्याला फक्त आपल्या धर्म आणि जातीच्या भिंतीतचं अडकून पडावं लागेल. पण त्याचवेळी चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची धमक आणि आपल्यातील मतभेद बाजूला ठेऊन एकमेकांना समजून घेण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि जिव्हाळा देखील त्याठिकाणी असावाचं लागतो... तर आणि तरच आपली प्रेमळ मैत्री टिकेल आणि वृद्धिंगत होत राहील. माझे सर्व हिंदू-मुस्लिम मित्र आणि त्यांच्यासोबतचे माझे नाते मी अशाप्रकारेचं जपले आहे. उगाच बिनकामाची वैचारिक लुडबुड न करता. आणि त्यांनीहि कधी तशी लुडबुड माझ्या आयुष्यात केली नाही.


पण सद्य:परिस्थितीतील राजकीय वातावरण बघता हे फार अवघड दिसत आहे. कोल्हापूरमधील अलीकडेच झालेली दंगल असो की औरंगाबादमधील तापलेलं धार्मिक वातावरण... प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजण्यावरचं टपून बसलेले दिसत आहे. ज्याला त्याला जातीआधारित आणि धर्माधारित मतांचं राजकारण करायचं आहे... तसं पाहायला गेलं तर सर्व काही नकारात्मक असं नक्कीचं नाही आहे. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता झालेल्या कोल्हापूरच्या दंगलीमध्ये एका मुस्लिम बांधवाचं झालेलं व्यावसायिक नुकसान, नंतर त्याच्या काही हिंदू मित्रांनीच भरून दिलं आणि त्याचा व्यापार उदीम आणि उपजीविकेचं साधन सामूहिक आर्थिक मदतीतून परत बसवून दिलं. 



आजपासून साधारण सहा एक महिन्यापूर्वी... मला आजही तारीख आठवते... कारण त्याचं दिवशी मी पाचव्यांदा रक्तदान केल होतं. दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी भल्या पहाटे पहाटेचं मी कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम मधील माझा मित्र विशाल इंगोलेला कॉल केला, "विशाल भाई... एका गरजू  महिलेला रक्ताची खुप आवश्यकता आहे यार... तुझ्याकडे एखादं ब्लड कार्ड असेल तर दे किंवा आपल्या संभाजी ब्रिगेड मध्ये कोणी रक्तदान करणारा असेल तर सांग भावा... अर्जंट आहे यार... ३ बॅग रक्त पाहिजे...!"

तो म्हणाला की ''बघतो सर...!'' तो 'बघतो' असं म्हणाला कारण आठवड्याभरापूर्वीच त्याला आजारामुळे सलाईन घ्यावी लागली होती. पण तशाही परिस्थितीत तो त्याचवेळेस म्हणाला की कोणी नाही भेटलं तर मीच देतो सर... तुम्ही ताण नका घेऊ...! मी दुपारी परत एकदा त्याला कॉल केला... त्याने त्याच्या एक-दोन मित्रांना कॉल केलं होते, पण त्यांच्याकडून काही जमले नाही... आणि कार्डही भेटले नाही. 

संध्याकाळी तो ड्युटीवरून सुटला. कारण त्याची त्या दिवशी ९ ते ५ ड्युटी होती. तो घराच्या जवळ जात  नाही तर मी त्याला परत कॉल केला... "अरे झाल का काम...? मिळाले का रक्त...? आहे का कोणी रक्त देणारं...?" फोनवरील त्याचा नाराज सूरानेचं मला परिस्थितीचा अंदाज आला.

मी म्हणालो... "जाऊ दे नसेल तर... मी येत आहे... तू तयार राहा...!" तो रूमवर पोहचत नाही तर मी  डायरेक्ट त्याच्या घराखाली हजर होतो...! मग त्याने घाईतच तोंडावर पाणी मारले आणि तसाच युनिफॉर्म बदलून माझ्यासोबत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आला. आणि आम्ही लगेच  हॉस्पिटल मधील रक्तपेढी गाठली. 

तेथे जाऊन रक्तदानाचा फार्म भरण्याआधी चौकशी करत असताना मला पुर्ण माहिती कळाली कि ती गरजू महिला एका गरीब मुस्लिम कुटुंबातील होती व त्या महिलेला बाळंतपणमुळे अति-रक्तस्राव झाला होता... आणि अतिव रक्तस्रावामुळे ती मृत्यूच्या दारी उभी होती. ते मुस्लिम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील दुर्गम अशा किनवट तालुक्यातील म्हणजेच माझ्याचं गावाकडील होतं आणि त्यांचे इथे कोणीच नव्हतं. अचानक ते माझ्या संपर्कात आले... आणि त्यांनी ३ रक्तदात्यांची मदत मागितली. त्यामुळे आम्ही दोघे तर तयार झालोचं होतो, पण अजूनहि एक तिसरा व्यक्ती हवा होता. आणि त्यातच तिच्या घरच्यांनी आधीच तिच्याचसाठी रक्तदान केलेलं होतं. त्याचवेळी आम्हाला आमच्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या एमएमसी कॅन्टीनमधील केतनभाऊ चव्हाण दिसले. त्यांना मी फक्त शब्द टाकला की केतनभाऊ रक्त द्यायचे आहे...! पण तेही गेल्याचं आठवड्यात बिमार होते... पण त्या महिलेला असलेली रक्ताची गरज आणि माझ्या शब्दासाठी म्हणून केतनभाऊ देखील लगेच रक्तदानासाठी तयार झाले...! आणि अशाप्रकारे आम्ही तिघांनी मिळून त्या गरीब व मजूर मुस्लिम कुटुंबातील महिलेसाठी थोडादेखील विचार न करता रक्तदान केले...!


इथपर्यंत तरी माझा असा समज होता की रक्ताची गरज असेल तर दवाखान्यात व्यक्ती कधी जात, धर्म किंवा प्रांत बघत नाही. पण तो माझा गैरसमज होता, हे मला थोड्याच दिवसात कळालं. एम.डी. मेडिसिन झालेला माझा मित्र डॉ. डीएसव्हीआर प्रसाद जेंव्हा तो तेलंगणामध्ये एम.बी.बी.एस.च्या इंटर्नशिपमध्ये होता तेंव्हा त्याच्यासोबत घडलेली एक घटना मला एके दिवशी सांगत होता...


अरे भाई तू बिलिव्ह नहीं करेगा... लेकिन जात सब तरफ है रे... मैं सच में बता रहा हूं... तू सोच भी नहीं सकता...

"मैं जब सर्जरी पोस्टिंग कर रहा था... तब एक पेशंट के रिलेटिव्ह को ब्लड लाने के लिये फॉर्म भरके दिया, तो वो मेरेको पूछा की 'रेड्डी' के जात का ब्लड मिलेगा क्या...!?''

मैं वो सूनके सच में हँग हो गया रे... थोडी देर के लिये शॉक में चला गया मैं...!!!  पहले मुझे भी बिलकुल तेरी तरह ही लगता था की ब्लड बॅग के लिये कोई क्यू 'जात' पूछेगा...!?



नासके कांदे तर सगळीकडेच आहेत म्हणा. पण जर आपल्याला समाजात सौहार्दाने राहायचे असेल तर असले सडके व कुजलेले, जात्यंध आणि धर्मांध विचार बाजूलाच करावे लागतील. धर्मनिरपेक्षता अंगिकारावीच लागेल. या नासक्या कांद्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल... आणि वेळीचं या जात्यंध आणि धर्मांध कुप्रवृत्ती ठेचाव्या लागतील. नाहीतर हे सर्व समाजाला नासवतील...!!!


आणि त्यासाठी 'धूल का फूल' सिनेमातील मनमोहन क्रिष्णन अभिनित, साहिर लुधियानवी रचित, एन. दत्ता ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मुहम्मद रफी साहेबांनी आपल्या सुमधुर स्वरात गायलेल्या खालील ओळींचा आशय लक्षात घेऊन वेळीचं अंगिकारावा लागेल आणि ह्या गाण्याच्या  शब्दरचना आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या डोक्यातही रुजवाव्या लागतील...


''तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा... इन्सान की औलाद है इन्सान बनेगा...!!!


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. १४/०७/२०२३.

Comments

  1. You are really true indian deshbhakt. U r firstly indian and lastly also indian. whatever your religion,your thinking is authentic. salute Heartly Congratulations

    ReplyDelete
  2. Khup Sundar Sir 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान