Skip to main content

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf


साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता...


पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती...


"माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती...


हा सांग ना... मी म्हणालो.


पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?"


"अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!"


माय तुला माहिती का...!?


काय गं...?!


"माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!"


काय...!!!???


"माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???"


"मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा सगळ्यात जास्त जीव माझ्यात होता...!!!???" ती पुढे बोलत होती... पण मला आज कळलं, कि तिचा सगळ्यात जास्त जीव तुझ्यात होता रे...! माय प्रणा... खरंच खूप लाडका होतास रे तू तिचा...!!!"


रडत रडतंच ती हे सर्व सांगत होती... आणि मीही पाणावलेल्या डोळ्याने शांतपणे तीच बोलणं ऐकत होतो. आणि ऐकता ऐकता मी कधी माधुरी ताईच्या आठवणीत "त्या भयाण" भूतकाळात पोहोचलो, हे मला देखील  कळलं नाही...


आजपासून जवळपास १० वर्षांपूर्वीची एक "नकोशी" गोष्ट आहे... २० सप्टेंबर २०१३ रोजीची...

अगदी सकाळपासूनच मी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या सप्लिमेंटरी परीक्षेचा अभ्यास करत माझ्या कॉलेजच्या लाइब्ररीत बसलो होतो... त्यामुळे साहजिकच मोबाईल व्हायब्रेशन मोड वर होता... साधारण सकाळी साडेअकराच्या सुमारास मला माधुरी ताईचे दोन-तीन कॉल येऊन गेले... मी सुद्धा नेहमीप्रमाणे अच्छा माधुरी ताई आहे का...!? सहज कॉल केला असेल तिने असा विचार करून... आणि दुपारी जेवणाच्या वेळेला परत करता येईल कॉल तिला, म्हणून मोबाईल बाजूला ठेऊन पुन्हा वाचत बसलो...

मग दुपारी २-३ च्या सुमारास लायब्ररीच्या बाहेर येऊन तिला कॉल केले... पण तिनी कॉल उचलले नाही... जाऊ दे ती कामात असेल म्हणून मी परत अर्ध्या तासांनी कॉल करून पाहिला... पण ह्यावेळेस तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता... मोबाईल बंद येत होता, तरीही मी तिला  ८-१० वेळेस कॉल करण्याचा प्रयत्न केला... पण तिचा कॉल लागलाच नाही... कधीच लागला नाही... तिचा मोबाईल तेंव्हा स्विच ऑफ झाला... तो आजतागत स्विच ऑफच आहे...!!!???


आणि त्यावेळेस माझ्या अल्लड मनाला परीक्षेच्या नादात पुढचे १०-१२ दिवस ह्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती, कि माधुरी ताई मला सोडून गेली आहे... कायमची...!!!


ऑगस्टमध्ये माझा बर्थडे होता... आणि त्याचं वर्षी सप्टेंबर मध्ये माझ्या परीक्षा असल्यामुळे मी ऑगस्टपासून औरंगाबादलाच होतो... कदाचित मी ऑक्टोबर मध्ये घरी परत आल्यावर मला सरप्राईस गिफ्ट द्यायचा प्लान असेल तिचा... पण त्याच ऑक्टोबरमध्ये मी घरी गेल्यावर माधुरी ताईकडून मला असं "सरप्राईस" मिळेल... अशी कधीच अपेक्षा केली नव्हती मी...!!!

"प्री-एक्साम फिअर" मुळे सप्टेंबर एन्डलाचं मी परीक्षा न देताच घरी गेलो होतो... त्यामुळे "इयर डाउन" झालंच होत...

वाटलं होत... घरी गेल्यावर ताई आहे... कोणी काहीहि म्हणो... कसही वागो... पण ती मात्र माझ्याच बाजूने असेल; हे पक्क माहिती होत...!

पण घरी गेल्यावर... "आता ती मला कधीच दिसणार नाही" हा विचार आजही माझ्या मनाला सुन्न करतो... डोळ्यात अश्रू दाटून आणतो...!!!


आज जवळपास १० वर्ष झाली माधुरी ताईला जाऊन... पण तिच्यासोबतच्या माझ्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत... तिच्यासोबत घालवलेले क्षण आजही माझ्या हृदयाच्या तितक्याच जवळ आहेत... आणि ती सुद्धा जशीच्या तशी माझ्या स्मरणात आहे... कायम हसरी आणि लाजरी... माधुरी ताई...!!!


तो भयाण भूतकाळ आणि तिच्यासोबतच्या गोड आठवणी... ह्या संमिश्र संवादातचं मी आणि अश्विनी ताई परत वर्तमानकाळात आलो...


माधुरी ताई आणि आश्विनी ताई ह्या अपूर्वाच्या नात्यातल्या... रक्ताच्या नाही... पण प्रेमाच्या...! सद्य:स्थितीत अपूर्वा म्हणजे माझी बायको... आणि त्यावेळची माझी जवळची मैत्रीण... त्यामुळे त्याचवेळी माझंही त्यांच्यासोबत प्रेमाचंच नातं झालं होत... असंही मला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचीच नाती कायम जवळची वाटत आली आहेत... कारण त्या नात्यांतून आतापर्यंत मला फक्त निखळ प्रेमचं मिळालं आहे... तसंच या नात्यातून सुद्धा मला निव्वळ प्रेम... आपुलकी... आणि जिव्हाळाचं भेटत आलाय... आणि आजही आश्विनी ताईद्वारे ते प्रेम... ती आपुलकी आणि तो जिव्हाळा तसाच टिकून आहे... आणि माझी खात्री आहे की भविष्यातही आयुष्यभर हे नातं कायम असंच टिकून राहील...


असो... त्या भूतकाळाला मी काय बदलू शकत नाही... पण माधुरी ताईने माझ्यासाठी तिच्या एका मित्राकडे ५००० रुपये जमा केले होते... हे माझ्या विचारशक्तीपलीकडचे होते...!!! आणि आश्विनी ताईच्या देखील...!?


माधुरी ताईच्या त्या मित्राचा देखील जवळपास १० वर्षानंतरचं आश्विनी ताईला कॉल आला होता... दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते... अचानक बोलता बोलता त्याने तिला विचारलं...


अश्विनी अगं... "प्रणित कोण आहे...!?"


"का रे... काय झालं... का विचारतोय...!?" आश्विनीला पण त्यानी हे विचारनं विस्मयकारकचं होत म्हणा.


"अगं हे बघ मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही आहे... माधुरी जाण्यापूर्वी ती माझ्याकडे थोडे थोडे पैसे जमवून ठेवायची... आणि फक्त एवढंच सांगायची कि हे प्रणितसाठी आहे... आणि मग मीही तिला जास्त काही विचारलं नाही... ती गेली आणि तेंव्हापासून ते जमा झालेले ५००० माझ्याकडे तसेच पडून आहेत... तुझ्याशीही त्यांनतर माझा संपर्क नाही आला...आज जवळपास दहा वर्षानंतर तू भेटली... माझ्या बऱ्याच शंका दूर झाल्या... आणि हे बघ मला तिचे पैसे बिलकुल बुडवायचे नाहीत... आणि म्हणून मला वाटत कि हे पैसे मी तुला द्यावेत... प्रणित कोण आहे, हे मला माहिती नाही... पण तू त्या पैश्याची माधुरीची बहीण म्हणून हकदार आहे असे मला वाटते... त्यामुळे ते पैसे मी तुला पाठवतो... फक्त कधी आणि कसे पाठवू ते सांग...! त्यानंतर त्या पैश्याच काय करायचं ह्याची सर्वस्वी जबाबदारी तुझी...!!!" अगदी इमानदारीने आणि कळवळीने तो हे सर्व सांगत होता.


"अरे... तो अपूर्वाचा नवरा आहे..." आश्विनीताई ह्या संमिश्र धक्क्यातून स्वतःला सावरतचं बोलली. कारण त्याला मी नाही, पण अपूर्वा माहिती होती. त्यानंतर लगेच तिनी मला कॉल केला.


तेंव्हापासून "त्या पैश्याच काय करायचं...?!'' हा प्रश्न आश्विनी ताईला सारखा पडत होता. ती एके दिवशी मला म्हणाली, कि मी तुझ्या येणाऱ्या बर्थडेला त्याच पैशात आणखी काही पैसे टाकून तुझ्यासाठी काहीतरी चांगलं गिफ्ट घायचा विचार करत होते... पण मला कळतंच नव्हतं कि काय घ्यावं... मी गजूलाही विचारलं... (गजूदा म्हणजे आश्विनी ताईचा नवरा) पण तो म्हणाला कि त्यालाच विचार ना... म्हणून मी असं ठरवलंय की ते पैसे मी तुला पाठवते... आणि त्यासोबत तुला आणखी  किती लागतील ते सांग...!? मला माहिती आहे कि तू त्या पैश्याच  काहीतरी चांगलचं करशील...!


५००० रुपये...!!!???

आजच्या काळात वर वर पाहता जरी ही एक छोटीशी रक्कम वाटत असली तरी तिची किंमत माझ्या लेखी 'विरासत' म्हणूनचं  राहील...

त्यामुळे ती छोटीशी रक्कम... ते ५००० रुपये... जरी माधुरी ताई माझ्यासाठी ''एक गिफ्ट'' म्हणून ठेऊन गेली असेल... तरी "ते गिफ्ट" माझ्यासाठी 'माझी लाखमोलाची विरासत' म्हणूनचं मला जलमभर पुरवायची होती...!


आणि तेंव्हापासूनचं म्हणजे मागच्या मार्च महिन्यापासून "त्या पैश्याच काय आणि कसं करायचं...?! हा प्रश्न मला देखील पडायला लागला... शेवटी माझं सुप्त आणि भावनिक मन ह्या निष्कर्षावर येऊन पोहोचलं, कि त्या पाच हजारातून अशी एखादी गोष्ट करायची कि "जेणेकरून माझी माधुरी ताई सतत माझ्या जवळ राहील... आणि तिची आठवण आम्हा सर्वांसाठी नेहमी सुखद राहील...!"


त्याचवेळी मागच्या एप्रिल २०२३ च्या 'फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव' साजरा करतानाच्या दरम्यान You Tube वर मी पुन्हा एकदा 'सर्वव्यापी आंबेडकर' ही 'एबीपी माझा'वरील डॉक्युमेंटरी सिरीस बघत होतो. त्यातल्या 'ग्रंथप्रेमी आंबेडकर' ह्या भागात बाबासाहेबांनी अमेरिकेहून २७ मार्च १९१६ ला 'बॉम्बे क्रोनिकल' ह्या वृत्तपत्रास लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आला आहे; ज्यात बाबासाहेबांचे विद्यार्थीदशेतील ग्रंथ आणि ग्रंथालयावरील निस्सीम प्रेम व्यक्त होते.


संपादक 'क्रोनिकल' यांस,


महोदय,


सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या अतिशय मागासलेल्या भारतासारख्या देशात, पुनर्निमाणाची प्रचंड जबाबदारी डोक्यावर घेणा-या प्रामाणिक नेत्यांची आज देशाला गरज आहे.  या माझ्या विधानाशी आपण सहमत असालच. दिवंगत गोखले आणि फिरोजशहा मेहता यांच्या व्यक्तित्वात आपणास असे नेतृत्व लाभले होते. आपल्या अथक प्रयत्न व त्यागामुळे त्यांनी आपणास कायमचे ऋणी करून ठेवले आहे. जनतेशी ते इतके एकरूप झाले होते व त्यातल्या त्यात श्री. मेहतांनी जनतेचा इतका विश्वास संपादन केला होता, की त्यांचा मृत्यू हा निसर्गाचा जादूचा खेळ वाटायला लागतो.


आपल्या अनेक समस्या अंगावर घेऊन त्यापैकी काही सोडवण्याचे श्रेय त्यांना आहे. त्यांनी काही प्रश्न आपणा करिता ठेवलेले आहेत. परंतु आपली त्यांचेवरील श्रद्धा इतकी गाढ आहे, की त्यांनी केलेल्या कार्याबद्दलच्या आदरामुळे आपणासमोर वाढून ठेवलेले प्रश्न आपण बाजूस सारलेले आहेत. आपणासमोरच्या प्रश्नांची सोडवणूक करीत बसण्यापेक्षा आपल्या करिता ज्यांनी आयुष्य वेचले आहे त्यांची उचित स्मारके उभारण्याचा आपण प्रयत्न करणे हे देखील स्वाभाविक आहे असे समजले पाहिजे.


माझ्या हाताशी आलेल्या भारतीय वृत्तपत्रांवरून असे दिसते, कि दिवंगत गोखले यांचे स्मारक भारत सेवक समाजाच्या शाखा सर्वदूर निर्माण करून त्या स्वरूपात उभारले जाणार आहे, परंतु मुंबई नगर परिषद कार्यालयासमोर पुतळा उभारून फिरोजशहा मेहतांचे स्मारक कायम करण्याचा मानस दिसत आहे.


व्यक्तिशः मला अशा पद्धतीचे फिरोजशहा मेहतांचे स्मारक जुजबी व क्षुल्लक स्वरूपाचे वाटते. निदान ते त्यांच्या लौकिकास साजेसे नाही.


त्यांचे स्मारक त्यांच्या कीर्तीस साजेसे असावे. एवढेच नव्हे, तर भावी पिढ्यांना ते उपयुक्त ठरावे अशा पद्धतीच्या स्मारकाचा विचार का होत नाही याचे मला दुःख होते.


या दोन हेतूंच्या पूर्ततेसाठी मी नम्रपणे असे सुचवितो, की 'सार्वजनिक ग्रंथालय' स्वरूपात फिरोजशहा मेहतांचे स्मारक उभारण्यात यावे. या सार्वजनिक ग्रंथालयाचे नाव ''सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय'' असे ठेवावे. 


समाजाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ग्रंथालयाची 'संस्था' म्हणून अजून आपण विचार केलेला नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. ग्रंथालयाच्या लाभांची चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. मात्र मुंबईसारख्या बुद्धिमान समाज असलेल्या शहरात असे सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय नसावे हे या शहरास लज्जास्पद बाब आहे व जेवढ्या लवकर ही त्रुटी भरून काढता येईल तेवढे बरे.


मुंबई शहरात काही खाजगी वाचनालये स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे चालवली जातात. गलथान कारभार असलेली ही ग्रंथालयेही या इमारतीत आणण्यात आली व ग्रंथालय इमारत ही फिरोजशहा मेहता निधीतून उभारण्यात येऊन तिला मेहतांचे नाव दिले, तर मी सांगितलेले वरील दोन्ही उद्देश सफल होतील. आधुनिक पद्धतीची प्रशासकीय व्यवस्था व ग्रंथ खरेदीसाठी लागणाऱ्या या पैशांचा विचार करावयाचा म्हटल्यास, माझी खात्री आहे, मुंबईतील अनेक दानशूर व्यक्ती ही उणीव भरून काढतील.


अमेरिकेतील भव्य विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाचा विद्यार्थी या नात्याने माझी खात्री पटली आहे, की बौद्धिक आणि सामाजिक उन्नतीकरिता समाजास ग्रंथालयाची अपरिहार्य आवश्यकता आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात याची उणीव आहे, याचीही मनात खंत वाटत आहे. आधुनिक भारतीय इतिहासातील थोर पुरुषांचे उचित आणि कायम टिकणारे स्मारक कसे असावे, हे मुंबईच्या जनतेस या प्रसंगी सुचवणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. 


भारतातून दहा हजार मैल लांब असल्यामुळे देशातील बातम्या कळण्यास विलंब लागतो आणि म्हणूनच मला ही सूचना देण्यास उशीर होत आहे, नाही पेक्षा उशीरा का होईना, परंतु प्रस्ताव देणे बरे.


आपला,

भिमराव रामजी आंबेडकर,

ता. २७ मार्च १९१६,

लिव्हिंगस्टन हॉल, कोलंबिया युनिव्हर्सिटी,

न्यूयॉर्क, अमेरिका.


त्यानंतर मी संदर्भ शोधून बाबासाहेबांचं हे वरील पत्र सविस्तर वाचलं आणि त्याचवेळी ठरवलं की माधुरी ताईची आठवण म्हणून आपणही असंच काहीतरी करायचं. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आणि भविष्याचे प्लॅन लक्षात घेता, माझं स्वतःच वैयक्तिक/खाजगी ग्रंथालय उभारायला अजूनतरी मला वेळ आहे.


पण मग तो पर्यंत  काय...!?


माझी मागच्या दहा वर्षांपासून एक इच्छा होती की बाबासाहेबांचे सर्व पुस्तके आपण स्वतः घेऊन वाचायची आणि स्वतःच बाबासाहेब समजून-उमजून घ्यायचे. पण पदवी-पदव्युत्तर शिक्षणाच्या काळात ह्या गोष्टींकडे मला लक्ष नाही देता आलं किंवा मला ते कधी जमलंच नाही. पण आता माझं वैद्यकीय शिक्षण संपल्यामुळे उशिरा का होईना पण बाबासाहेबांचं साहित्य वाचायचंच असं ठरवलं होतंच. मग काय मी लगेच मग आश्विनी ताईला कॉल केला...


"हॅलो ताई... माधुरी ताईने माझ्यासाठी ठेवलेले पैसे लगेच पाठव...! आणि हो, ऐक ना... तुझ्याकडे आणखी काही शिल्लक असतील तर तेही पाठव...!" मी माझी पगार आल्यावर तुला परत देईल.


"ठीक आहे...! पण किती पाठवू...!?"


"पाठव १० एक हजार...!"


''आणि हो रे ठीक आहे... पाठवते लगेच... पण तुला पैसे परत कोणी मागितले... लयी शहाणा झालास की काय...!? मोठा झाला आणि कमवायलास तर लगेच पैसे परत करायची भाषा बोलायला लागलास... तू तर...! तुला मी परत मागितले का पैसे...!?'' रागा रागातच बोलली ती...


"तसं नाही ग... पण तुला पण लागतातंच ना... आणि माझ्या कामासाठी तुला कशाला त्रास देऊ उगाच...!"


ते जाऊ दे... पण काय काम आहे तुझं...?!


काही नाही ग... बाबासाहेबांची पुस्तके घ्यायची होती...!?


"माय मागून मागून कशासाठी पैसे मागतंय गं लेकरू...!!! ठीक आहे रे प्रणा... असंही मी तुला माधुरी ताईच्या पैश्यासोबत माझ्याकडून काहीतरी देणारंच होती... आणि गजूसुद्धा म्हणाला की यावेळेस स्पर्शचा वाढदिवस आपण साध्या पद्धतीने करूया... (स्पर्श म्हणजे आश्विनी ताईचा गोड मुलगा) आणि उरलेले पैसे प्रणितला देऊ या... तो असाही जरा सामाजिकचं  प्राणि आहे...! तो नक्कीच त्या पैश्याचा सदुपयोग करेल. त्यामुळे असु दे ते पैसे तुलाच...! असंही मी तुझ्यासाठी कधीच काही नाही केलयं... तुझ्यासाठी कधीच काही नाही घेतलंय... त्यामुळे सध्यातरी माझ्याकडून, स्पर्शकडून आणि गजूकडून तुझ्यासाठी हे गिफ्ट म्हणून ठेव... आणि तुझ्या बर्थडेला आणखी काहीतरी वेगळं घेऊ...!" अधिकारवाणीने ती हे सगळं बोलत होती.


जरा भावनिक होतंच मग मी कॉल ठेवला...

परत विचार केला आणि स्वतःशी म्हटलं जरा पगार होईपर्यंत वाट पाहू...


आणि त्यानंतर पगार झाल्यावर त्या पैश्यात आणखी १० हजाराची भर टाकून मी जवळपास २५००० हजारांची पुस्तके विकत घेतली... त्यात बाबासाहेबांची Writing & Speeches (DBWAS) चे सर्व व्हॉल्युम्स हिंदी, इंग्रजी आणि काही मराठी संस्करण - महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार द्वारा प्रकाशित, आणि भारतीय संविधान आणि भारतीय संवैधानिक कायद्यावरील काही पुस्तके नागपूरवरून घेतली आणि काही ऑनलाईन मागविली.


आज माझी माधुरी ताई जाऊन जवळपास १० वर्ष झालीत... तिची वेळोवेळी आठवण येते राहते... वर्षाच्या ह्या वेळेला तर खूपच जास्त... तिची आजही तेवढीच कमतरता जाणवते... माधुरी ताईच्या अकाली जाण्याने जर सगळ्यात जास्त कोणाला त्रास झाला असेल तर आश्विनी ताईला...! कारण लहानपणीच आई आणि वडिलांच्या जाण्यानंतर माधुरी ताईचं ''तीच'' सर्वस्व होती... आणि तीही तिला अशी एकाकी सोडून फार दूर निघून गेली होती. 

आश्विनी ताई मला आजही म्हणत राहते, कि "माय प्रणा... तिच्या जाण्यामुळे माझं कधीच न भरून निघणार नुकसान झालयं बघ... तिनी असा मला सोडून नाही जायला पाहिजे होत रे... निदान माझा तरी विचार करायला पाहिजे होता तिनी...!"


असो, माधुरी ताईच्या अशा अकाली जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही आहे... हे मला, अपूर्वाला आणि आश्विनी ताईला ठाऊक आहे...


पण तिची याद आम्हाला कायम राहावी म्हणून... आणि तीच छोटंसं का होईना पण एक स्मारक असावं म्हणून मी आज माधुरी ताईच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त एक बुक शेल्फ बनवलाय... आणि त्याच नाव ठेवलंय...


Madhuri's Bookshelf


...आणि असं ठरवलंय कि त्या बुकशेल्फ मध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, त्यांच्याबद्दल इतर लेखक-लेखिकांनी लिहिलेली आणि त्यांच्यासंबंधितचं पुस्तके असतील...!


त्यामुळे या बहाण्याने का होईना पण  यापुढे जेंव्हा जेंव्हा मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत असेल आणि बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या सहवासात असेल: तेंव्हा तेंव्हा माधुरी ताईच्या प्रेमळ आणि सुखद आठवणी कदाचित माझ्या सोबत असतील...


आणि हो... आश्विनी ताई...

येणाऱ्या काळात जेंव्हा कधी आपल स्वतःच असं एक ग्रंथालय होईल... आणि ते नक्कीच होईल...! त्यावेळी खालील मजकूर दर्शवलेलं एक "सर्वात मोठं" बुकशेल्फ त्यात कायम असेल...


Madhuri's Bookshelf 

(In Loving Memory of My Dear Madhuri Tai)



© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि.  २०/०९/२०२३.

Comments

  1. आज सरकारचे ग्रंथलयाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे, त्यांनी ग्रंथलयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  2. भारावून गेलो Great Madhuri tai ch bookshelf

    ReplyDelete
  3. Very good investment 👍

    ReplyDelete
  4. 🥺😢😓 तू त्या पैशांचा वापर खूप छान केलास..👌🏻👌🏻
    कायम आठवणीत राहील आपली माधुरी ताई..😓

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान