Skip to main content

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior


आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला...

"हा दादा... बोल ना..." मी म्हणालो.

गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!?

हो दादा... का...!? काय झालंय?

गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...!

काय...!!!???

गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...!

तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला...

गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!?

Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...!


त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो.


तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घाबरत घाबरतंच मला अडखळत अडखळत सांगत होता...

"रात्री दोनेकच्या सुमारास मी गाढ झोपेत असताना अचानक माझ्या अंगावर काही पडल्यासारखं झालं आणि मला जाग आली. डोळे उघडून बघतोय तर माझ्यावर अंदाजे ७-८ जण पडलेले होते. आणि ते मला अक्षरश: तुडवत होते. धूर आणि अंधारामुळे मला तितकं काही दिसत नव्हतं. फक्त आकांड-तांडव चालू होता. तेवढ्यात मला वर एक खिडकी दिसली. तेवढ्या लोकांमधून मार्ग काढत मी खिडकीला हातानं फोडण्याचा प्रयत्न केला. पण खिडकीला जोरात मारल्यामुळे हाताला लागलं. म्हणून मी नंतर दोन अँगलला हात पकडले आणि एका अँगलला डावा पाय अडकवून उजव्या पायाने काचेवर वरच्या बाजूने जोर जोऱ्याने लाता मारत होतो. मला बघून काही लोकही मग काचेवर बुक्क्या मारायला लागले. शेवटी पूर्ण ताकदीनिशी एक जोराची लात मारली आणि खिडकी उघडली. पण जोरात लाता मारून थकून गेल्याने मी खाली पडलो आणि माझ्या अंगावर पाय देऊन २-३ लोक वर निघून गेले. त्यानंतर मात्र मला लगेच त्राण आल्यामुळे मी पूर्ण ताकदीनिशी वर येण्याचा प्रयत्न केला आणि अँगलला धरून वर आलो. वर येऊन बघतोय तर गाडीवर आग पसरलेली होती आणि माझ्या आधी वर आलेले लोक बाजूला निघून गेले होते. त्यातही जमेल तस एखाद्या व्यक्तीला वाचवायचं म्हणून मी खिडकीत खाली हात टाकला आणि एका व्यक्तीचा हात पकडला... पण एवढया गोंधळात मला त्या व्यक्तीला वर काढता नाही आलं. आणि अचानक गाडीवरचा आगीचा लोळ वाढून माझ्या अंगावर आल्यामुळे मला खाली उडी घ्यावी लागली. आणि त्यातच माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि उजव्या पायात काच खुपसल्या गेली. लंगडत लंगडत मी बाजूला आलो आणि दुरूनचं गाडीच्या काचा फोडण्यासाठी दगड किंवा एखादा रॉड भेटते का पाहू लागलो. पण समृद्धीवर मला एक दगड नाही भेटला कि रॉड घेण्यासाठी एखादा ट्रक...! आणि काही मदत येण्याच्या आतच पूर्ण गाडीने आग पकडली. मला हतबल होऊन पाहण्यापेक्षा काहीच करता नाही आलं..."


हे सर्व सांगतांना ''मला आणखी कोणाला वाचवता आलं नाही'', ह्याचं शल्य त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात मला तो इथून परत जाईपर्यंत जाणवत होतं. ऐकतानाही अंगावर काटा येत होता. त्याने हे सर्व कसं सहन केलं आणि त्यातून तो बाहेर कसा येईल... हा प्रश्न अजूनही मला सतावतोय.

एकीकडे आपला मित्र ह्या भयावह प्रसंगातून वाचला ह्याच समाधान आहेचं पण दुसरीकडे ह्या अपघातात आपण गमावलेल्या  निष्पाप जीवांच्या मृत्यूने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने अजूनही माझा जीव कासावीस होतोय.


"मॉन्टी भाऊला ह्या बिकट प्रसंगाला समोर जाणं, कसं  जमलं असेल...!? आणि मी जर त्याच्या जागी असतो तर काय झालं असतं... काय केलं असतं... कसं केलं असतं...!?" या आणि अशा कैक विचारांनीच माझी भंबेरी उडतेय. हा प्रश्न थोड्यावेळासाठी का होईना... मॉन्टी भाऊ इथून परत गेल्यापासून सतत मनात येतोय. कदाचित शशिकांत (मॉन्टी) भाऊ मागच्या सहा वर्षांपासून पोलीस दलात असल्यामुळे त्याला हे जमलं असेल. पण ह्या भयावह प्रसंगाला त्याने कसं तोंड दिलं असेल... ह्याचं उत्तर मात्र तोच देऊ शकेल. सध्यातरी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं माझ्या आवाक्याबाहेरचचं दिसतंय... !


परंतु ह्या अपघात प्रसंगामुळे माणूस नावाच्या प्राण्यातील माणुसकीवर आणि एकंदरीत समाजातील सद्यःपरिस्थितीवर खरंच काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गाडीवरून उडी मारल्यानंतर बाजूला आल्यावर काही वेळाने मॉन्टी दादाने तिथे उपस्थित एका व्यक्तीला ११२ वर कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला... तर त्या व्यक्तीनं अक्षरश: त्याला नकार दिला... आणि त्याचवेळी मात्र तो व्यक्ती जळण्याऱ्या गाडीचा आणि त्यात जिवाच्या आकांताने जळणाऱ्या निष्पाप जीवांचा विडिओ काढण्यात मश्गुल होता. 

महामार्गाच्या पलीकडच्या लेनच्या गाड्या थांबून ती जळणारी गाडी पाहत होते... मदतीचं सोडा हो... पण कोणी उतरून साधी विचारपूसही करत नव्हते.

त्याचवेळी 'विदर्भ ट्रॅव्हल्स'ची एक गाडी त्याच मार्गाने बाजूने पुढे निघून गेली... आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजची जळणारी गाडी देखील 'विदर्भ ट्रॅव्हल्स'चीचं होती...! त्यामुळं आपला समाज नेमका कोणत्या दिशेनं चाललाय... हा प्रश्न दरवेळी निर्माण होतो आहे.


ह्या प्रसंगातून फक्त नकारात्मकताचं अधोरेखित होते आहे असंही नाही. मॉन्टी भाऊने इतर सहप्रवाशांना वाचविण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न... मागून आलेल्या ट्रक ड्रायव्हरने मॉन्टी भाऊला ११२ वर कॉल करण्यासाठी स्वतःहून दिलेला त्याचा मोबाईल... मॉन्टी भाऊला आमच्या संपर्कात राहण्यासाठी काही लोकांनी वेळोवेळी त्याला केलेली मदत... ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर राठोड आणि त्यांचे सहकारी यांनी ऍम्ब्युलन्समध्ये मॉन्टी भाऊला घाटीत आणून सोडेपर्यंत केलेली सोबत... ह्या सर्व गोष्टी नक्कीच सकारात्मकचं आहेत...! पण अशा बाक्या प्रसंगात आपल्यातील सकारात्मकताचं तेवढी दिसायला पाहिजे होती... एवढीचं तोकडी अपेक्षा होती...!


असो... शशिकांत गजबे उर्फ मॉन्टी भाऊ... ज्या पद्धतीने या कठीण आणि भयावह प्रसंगाला तू तोंड दिलेस... त्यासाठी तुला, तुझ्यातल्या जिद्दीला, तुझ्यातला पोलिसाला आणि तुझ्यातल्या माणुसकीला सलाम...!


...आणि दुर्दैवीपणे या अपघातात आपण गमावलेल्या निष्पाप जीवांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली...!


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. ०१/०७/२०२३.

Comments

  1. This is not the fault of Driver or the Bus passing by .This is the immense pressure under which driver drives the vehicle .They are under pressure of their owner of reaching early.Therd is competition among travel companies for providing best service and best service in terms of reaching early or on time.Incident was heart wrenching

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी!

    ReplyDelete
  3. My sincerest condolences 💐 🙏🙏

    ReplyDelete
  4. Khup bhayanak prasang ahe ha

    ReplyDelete
  5. Condolences to those who lose their loved ones 😞

    ReplyDelete
  6. खुप भयंकर हृदयस्पर्शी प्रसंग आहे... 😭

    ReplyDelete
  7. Are bapre lai mota prasang hota ha

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान