Skip to main content

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...

जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...


२१ व्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट... "देखो २००० जमाना आगया" हे आमिर खानचं मेला पिक्चरमधील गाजलेलं गाणं त्यावेळेस टीव्हीवर 'चित्रहार आणि छायागीत' मध्ये हमेशा लागायचं... आणि "मेला" पिक्चरसुद्धा शुक्रवारी रात्री ९:३० वाजता बऱ्याचवेळा दूरदर्शनवर लागायचा... साधारण ६-७ वर्षांचा असेल मी तेंव्हा... त्यावेळी गावातील इतर मुलां-मुलींप्रमाणे मी देखील सिंदखेड ह्या माझ्या नाल्याकाठच्या गावात हसत-खेळत बेफिकीर बागडायचो...


दुनियादारीशी माझा अजूनतरी तरी तसा संबंध आला नव्हता...


आधीच मराठवाड्यातलं गाव अन त्यात आमच्या गावात असलेली पांढरीची जमीन म्हणजे दुष्काळात तेरावा महिना... त्यावेळेस पावसाळ्यात पाऊस आल्यावर साधारणतः डिसेंबर- जानेवारीपर्यंत पाण्याची चणचण जाणवायची नाही. पण फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरु झाल्यामुळे गावात पाण्याची वानवा जाणवायला लागायची. त्यानंतर आमच्या गावात पाण्यासाठी एकच उपाय होता... तो म्हणजे आमच्या गावातील नाला...

माझ्या गावाची ठेवण सुद्धा विशिष्ठ अशीच आहे. गावाभोवती नाला यू आकाराचा आहे. गावाला नाला गोल फिरकी मारून जातो. नाल्याच्या 'यू' आकाराच्या मधल्या भागात ज्या ठिकाणी मी राहायचो ते म्हणजे लिंगमपेठ... सिंदखेडमधली छोटी वस्ती... आणि यू आकाराच्या एका काठावर सिंदखेड आणि दुसऱ्या काठावर दोन्ही गावातील लोकांची शेती... नाला बरोबर सिंदखेड आणि लिंगमपेठच्या मध्ये होता... आणि उन्हाळ्यात दोन्हीकडचे लोकं पाणी भरायला नाल्यावर यायचे.

नाल्यात ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात डांबराच्या किंवा तेलाच्या टाक्या रेतीमध्ये गाडून पाणी वर काढल्या जायचं. त्यातूनच मग पिण्याचं सोडून इतर वापराचं पाणी कावडीने सर्व लोकं आपआपल्या घरी घेऊन जायचे. पिण्याच्या पाण्यासाठी रेतीमध्ये छापे किंवा झिरे बनविल्या जायचे. रेतीमध्ये उथळ खोलगट भाग बनवून त्यात वर जे पाणी यायचे ते मग स्वच्छ कापडाच्या साहाय्याने कळशी किंवा हंड्यात गाळून पिण्यासाठी ते पाणी वापरले जायचे. परंतु त्यासाठी आधी तो झिरा छापल्यावर पाणी वर येऊन... त्यातला गाळ खाली जमून ते पाणी स्वच्छ होण्याची तासनतास वाट पाहावी लागायची.

गावात महार, वाणी, आदिवासी, कुणबी, बंजारा (गोरमाटी) आणि ब्राह्मण जातीची बऱ्यापैकी घर होती. पाणवठ्यावर सिंदखेडमधून ब्राह्मणाच्यादेखील बाया पाणी भरायला यायच्या. आणि लिंगमपेठमधून मी कधी-कधी मम्मी आणि काकूसोबत पिण्याचे पाणी भरायला जायचो. सिंदखेडकडील नाल्याचा भाग बऱ्यापैकी उंचावर आहे. त्यामुळे तिकडून येणाऱ्या माणसाला लिंगमपेठ मधून कोण नाल्यावर येतंय ते बरोबर दिसायचं. एके दिवशी असाच मी मम्मीसोबत पाणी भरायला गेलो असता बामणाच्या काही बायांनी त्यांच पाणी भरून झाल्यावर; मम्मी आणि काकू येताना बघुन तो पाणवठ्यातील झिरा बुजवून आणि गढूळ करून ठेवला आणि सिंदखेडच्या उमाटाकडून त्यांच्या घरी परत जात होत्या. नाल्यावर पोहोचल्यावर मम्मी आणि काकू चिडून रागानं लाल झाल्या.

"हालकट कुठल्या कि बदमाश बाया... दरवेळेस असंच करून जातात. ह्यांच्या काय बापाचं खाल्लं काय आम्ही... पियायच पाणी गढूळ करून जायला काय दुखते कि यायची... बामन कुठल्या की... आज बी यायच्यातले जातीचे किडे काय मरत नाही..."  त्यांचं झिरा छापत छापत बोलणं सुरु होत आणि मी आपला मुकाट्यानं ऐकत होतो.

त्यानंतर काही क्षणांसाठी माझं पोरसवदा मन कावर-बावरं झालं... आणि झर्र्कन होता नव्हता तेवढा अभिमान पांढऱ्या मातीत मिसळला... कारण गावात पाटील सरांचा म्हणजे पप्पांचा रुबाब होता. पाटील सरांचं पोरग म्हणून गावात आणि पोट्यापाट्यात माझी जरा वट होतीच म्हणा. हा प्रसंग कायमचा माझ्या मनावर कोरल्या गेला... शेवटी दुनियादारीशी माझा संबंध आलाचं... अगदी ७-८ वर्षाच्या पोरसवदा वयातंच...!


नंतरच्या आयुष्यात मम्मी आणि पप्पासोबत बऱ्याचदा चर्चा करताना त्यांनी देखील त्यांच्यासोबत घडलेले असे अनेक जातीवादी प्रसंग मला सांगितले. 

वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थीदशेतचं मी सामाजिक चळवळीत आलो. कॉलेजमधील  थोडं सामाजिक भान असलेले मित्र, ज्यांना कधी जातीवादाचे चटके बसले नव्हते; ते सांगायचे की आम्हाला जात तर डिग्रीला ऍडमिशन घेतानाच कळली... आधीतर आम्हाला जातचं माहिती नव्हती...! काही  SC/ST मित्र देखील म्हणायचे की आम्हाला जात फक्त कास्ट सर्टिफिकेट आल्यावरच कळाली... काही अंशी ते खरं जरी असलं तरी माझ्या बाबतीत नक्कीच ते तसं नव्हतं... जात तुम्हाला जन्मापासूनच चिकटलेली असते... तुम्हाला ती कळो अथवा ना कळो... समजो अगर न समजो... तुम्ही जात माना कि नका मानू... जात तुमचा पिच्छा सोडत नाही... त्यामुळे जातीसोबत येणारा संघर्षही येथे अपरिहार्यचं असतो.


आज १५-२० वर्षानंतर गावात मुबलक पाणी आलंय. योगायोगाने ५-७ वर्षांपूर्वी गावात जेंव्हा पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नव्हता... त्याच वेळेस आमच्या शेतात खोदलेल्या विहिरीला १५-२० फुटावरच पाणी लागलं... आणि शेत गावाला लागूनच असल्यामुळे सारा गाव पिण्याचे पाणी भरायला विहिरीवर यायचा... त्यात त्या बामनाच्याही घरचे लोक यायचे...! आजही बरीच लोक येतात... आणि पूर्वाश्रमीच्या महार मास्तराच्या शेतातल्या विहिरीचं "चवदार पाणी" पिऊन तृप्त होतात.


आम्हाला पाण्याच्या घोटासाठीदेखील इथे तरसावं लागलं आहे आणि इथल्या व्यवस्थेसोबत झगडावं लागलं आहे. आज बऱ्याच अंशी जीवन सुसह्य झालं असलं तरी हा झगडा फक्त पाण्यासाठी कधी नव्हता मुळीच... बाबासाहेबांच्याचं शब्दात सांगायचं झालं तर...

"Why do we fight? It is not simply for drinking water. Drinking the water will not give us very much. It is not even a matter of only our human rights, though we fight to establish the right to drink water. But our goal is no less than that of the French Revolution. This was fought for the reconstruction of society, for the eradication of old society based on feudal inequality and the establishment of a new society based on liberty, equality and fraternity. Similarly, we want to end the old inhuman caste society based on inequality and reconstruct the society on the basis of liberty, equality and fraternity. This is our goal."

"आपलं भांडण हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नाही. फक्त पाणी पिण्याने आपल्याला फार काही मिळणार नाही. फक्त हाचं आपल्या मानवी हक्कांचा विषय नाही, तरीही आपण पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढतो आहे. पण आपले ध्येय आहे हे फ्रेंच राज्यक्रांती पेक्षा कमी नाही. समाजाच्या पुनर्रचनेसाठी, सरंजामशाही असमानतेवर आधारित जुना समाज नष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता आणि मैत्रीवर आधारित नवीन समाजाच्या स्थापनेसाठी हा लढा लढला गेला. त्याचप्रमाणे आम्हाला देखील असमानतेवर आधारलेली जुनी अमानवीय जातीय समाजव्यवस्था संपवायची आहे आणि स्वातंत्र्य, समता आणि मैत्री या मूल्यांवर आधारित समाजाची पुनर्रचना करायची आहे. हेच आमचे ध्येय आहे."


आजपर्यंत संघर्ष आणि चळवळीतून आपण बरंच काही मिळवलं आहे... आणखी बरंच काही मिळवायचं आहे. पण बाबासाहेब आणि आपल्या पूर्वजांकडून जे काही मिळालंय ते पुढच्या पिढीसाठी टिकवण्यासाठीचा संघर्ष अजूनसुद्धा आपल्याला करावाच लागणार आहे... कायम झगडावं लागणार आहे इथल्या व्यवस्थेशी... आपले संवैधानिक हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी...


कारण... आमच्या जगण्याचा संघर्ष इथं "पुराना" आहे...! 

#ThanksAmbedkar 💙


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

दि. २०/०३/२०२३.




Comments

  1. खूप छान 👍👍👍👍👌

    ReplyDelete
  2. Khup bhari sir

    ReplyDelete
  3. खूप भारी👍👏

    ReplyDelete
  4. Khup chan sir

    ReplyDelete
  5. खूप छान सर

    ReplyDelete
  6. खूप छान... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  7. 👍👍👍👌

    ReplyDelete
  8. Nice sir 🤝👍🌹

    ReplyDelete
  9. अप्रतिम मांडणी 👍👍👍

    ReplyDelete
  10. खुप छान दाजी👌👌👌

    ReplyDelete
  11. छान मांडणी।

    ReplyDelete
  12. खूपच छान... 👍

    ReplyDelete
  13. Sir keep writing ..Pen is the a powerful weapon to bring change in society

    ReplyDelete
  14. मस्त मस्त

    ReplyDelete
  15. DR.AKASH BHADRE21 March 2023 at 19:25

    खुप भारी सर👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior

समृद्धी महामार्ग अपघात: The Untold Story of a Brave Warrior आज सकाळीचं  डिपार्टमेंटला आल्या आल्याचं गजू दादाचा पुण्यावरून कॉल आला... "हा दादा... बोल ना..." मी म्हणालो. गजुदा: "अरे प्रणित कुठे आहेस तू...?" घाटीलाच आहेस ना...!? हो दादा... का...!? काय झालंय? गजूदा: अरे काल रात्री तो ऍक्सीडेन्ट झालंय ना समृद्धीवर त्यात आपला मॉन्टी होता...! काय...!!!??? गजूदा: अरे घाबरू नको... जे सात लोक वाचले ना त्यात हा पण आहे...! तेंव्हा कुठं थोडा जीवात जीव आला... गजूदा: पण त्याला औरंगाबादला घाटीलाचं आणत आहेत... आणि त्याचा फोन जळलाय... त्यामुळे तू चौकशी करून बघ की तो तिथे आलाय का...!? Okay दादा... बघतो मी... तू ताण नको घेऊ...! त्यानंतर लगेच मी घाटीच्या अपघात विभागात गेलो. दरवेळी भेटल्या भेटल्या स्मितहास्य करणारा मॉन्टी भाऊ बेडवर निस्तेज पडला होता. तोपर्यंत त्याचे रुटीन चेकअप झाले होते. पण काही एक्सरे, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन करायचे बाकी होते. त्यामुळे मी लगेच त्याला व्हीलचेअरवर बसवून सर्व तपासण्या करायला घेऊन निघालो. तपासण्या करण्याच्या कालावधीतचं दादा रात्री झालेला भयावह प्रसंग घा

Madhuri's Bookshelf

Madhuri's Bookshelf साधारण तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून माझा मोबाईल नंबर घेऊन आश्विनी ताईचा मला कॉल आला... तोही तब्बल सहा वर्षांनंतर... जुन्या-पुराण्या, इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा, बड-बड, शिकवे-गिले, हसन-रडणं आणि बरंच काही बोलणं झालं... दरम्यानचा काळ आम्हा दोघांसाठीही बराच कठीण गेला होता... पण एके दिवशी अचानक मला ताईचा कॉल आला... अगदी सात-आठ  महिन्यापूर्वीचं... त्या दिवशी तिच्या आवाजात एक वेगळीच नरमाई होती... जिव्हाळा होता... प्रेम होतं... आपुलकी होती... आणि तीव्र आठवण देखील होती... "माय प्रणित... तुला एक सांगू का रे...!?" हळूच ती बोलत होती... हा सांग ना... मी म्हणालो. पण मला कळतंच नाही आहे, तुला कसं सांगू ते...!?" "अगं सांग ना... त्यात काय एवढं विचार करण्यासारखं...!" माय तुला माहिती का...!? काय गं...?! "माधुरी ताई तूझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून पाच हजार रुपये ठेऊन गेली...!!!" काय...!!!??? "माय हो रे... मलाही अगदी असाच तुझ्यासारखा आश्चर्याचा धक्का बसला...!? मी पण काही वेळेसाठी थंडच बसले बघ...!!!???" "मला आतापर्यंत वाटायचं कि तिचा

वाचाल तर वाचाल...!

वाचाल तर वाचाल...! एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी सो-कॉल्ड चळवळीत आलो होतो. त्या काळात आंबेडकरांपेक्षा आंबेडकर सांगणाऱ्यांच्याच जास्त प्रभावात होतो मी...! मला तेच फुले, शाहू आणि आंबेडकर माहिती होते... जे ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या सो-कॉल्ड नेत्यांकडून त्यांच्या कुवतीप्रमाणे मला सांगितले गेले किंवा त्यांच्याकडून मला कळाले. हा सर्व मधला साधारण पाच-सहा वर्षांचा म्हणजे एम.बी.बी.एस. द्वितीय वर्षांपासून ते एम.डी.चं द्वितीय वर्ष संपेपर्यंतचा काळ मी ह्याच भ्रमात आणि प्रभावात जगत होतो. आणि हो... खरं सांगायचं म्हटलं तर ह्याच्यात त्या सो-कॉल्ड नेत्यांचा काही एक दोष नव्हता... त्यांना तर असेही चळवळीसाठी 'सतरंजी उचले'चं  पाहिजे असतात. हो सतरंजी उचलेचं... मुद्दाम मी इथे कार्यकर्ता हा शब्द नाही वापरला. चूक माझीच होती कि मी महापुरुष आणि चळवळ वाचून, समजून आणि उमजून घेण्याऐवजी फक्त त्यांचं ऐकून डोक्यात घेतली होती. असो... ह्या सो-कॉल्ड चळवळीच्या नेत्यांकडून विद्यार्थ्यांना भरकटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कधीतरी सविस्तर मी व्यक्त होईलच... सध्या इथे अधोरेखित करण्याचा मुद्दा हा शिर्षकान