लातूरचं शाहू कॉलेज, गंजगोलाईतला निलंग्याचा जिरा राईस आणि गांधी चौकातली इडली...!
लातूरचं शाहू कॉलेज, गंजगोलाईतला निलंग्याचा जिरा राईस आणि गांधी चौकातली इडली...!
सन २०१० ची गोष्ट... दहावीत महत्प्रयासान चांगले टक्के पडल्यामुळे लातूरच्या शाहू कॉलेजला एडमिशन मिळाली होती. पप्पांनी पहिल्याच दिवशी येऊन मुक्कावर बॉईस होस्टेलला एडमिशन घेऊन दिली आणि लातूरमधील अकरावी - बारावीचा अविस्मरणीय प्रवास सुरु झाला. कौन्सलिंग मध्ये Crop Science च्या तुकडीत प्रवेश झाला आणि पप्पा दुपारच्याचं गाडीने गावाकडे परतले.
दहा-पंधरा दिवसातचं पहिली युनिट टेस्ट झाली आणि मला जेमतेम ९१ मार्कचं मिळाले. जेमतेम म्हणण्याचं कारण कि माझ्या पुढच्या वीसेक पोरांना ९५ च्या वर मार्क होते. मी म्हणलं... पन्या लेका... चाल तुवं बोऱ्या बिस्तर बांधून परत आपल्या गावाकडं... तुवं कायी भजन जमत नाही इथं...!" लयी जाम टेन्शन आलं होत... भौ...!
पण मग पुन्हा संध्याकाळी होस्टेलला गेलो अन दुसऱ्या तुकडीच्या एका मित्रानं समजून सांगितलं... म्हणला…
आबे बस उगा... चुत्या हाईस का बे... मला इथं ८० चं पडलेतं… मी काय करू मग... बस उगा अभ्यास कर... ताण नको घेऊ... पुढच्या परीक्षेत घासून अभ्यास कर भावा... तू हमखास टॉप १० मध्ये येतूस...
आणि मग ह्याचसाठी सुरु झाला माझा हॉस्टेल टू लायब्ररी व्हाया गंजगोलाई-कॉलेज-गांधीचौक-कॉलेज असा Daily बेसिसचा कार्यक्रम… कारण त्यावेळेस आमचा असा एक गोड अन खुळा समज होता कि Crop Science मध्ये टॉप-१० मध्ये राहीलात तर तुमची MBBS ची शिट महाराष्ट्राच्या एखाद्या मेडिकल कॉलेज मध्ये पक्की झालीचं...!
आयुष्यात पहिल्यांदाच घर सोडून राहत होतो... मेस आणि मेसचं जेवण ह्याबद्दल बोलायला गेलं तर मेसचं जेवलेल्या सगळ्या वाचकांच्या पोटात लगेच ऍसिडिटीची सुरुवात होईल... आणि डोक्यात अळणी वरण दिसायला लागेल... त्यामुळे सध्या त्या विषयावर लिहिणं नकोचं...
पण अश्या कठीण वेळेस माझ्या आयुष्यात मदतीला धावून आलेल्या दोन गोष्टी म्हणजे गंजगोलाईतला निलंग्याचा जिरा राईस आणि गांधी चौकातली इडली...
आता तुम्ही म्हणाल वाचायलोत म्हणून काहीबी बरळतो का बे...!? इडली अन जिरा राईसनं कशी काय मदत केली असल बे तुयी...!?
सांगतो... सांगतो...
जर तुमच्या खिशात पैशाची चणचण असल आणि तुम्हाला तुमचा वेळ पण वाचवायचा असल... तर तुम्हाला म्हणून सांगतो... लातूरमध्ये आल्यावर ह्या दोन गोष्टी मेसच्या जेवणापेक्षा तुम्हाला दहा पटीनं बऱ्या वाटतील. बऱ्या काय ओ... जन्नत के माफीक भासतील... जणु वाळवंटात तहानलेल्या पामराला पाणी मिळणं...
गंज गोलाईत तसे जिरा राईसचे त्याकाळी पाचेक गाडे होते... सकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान हे गाडे सुरु होत होते. आणि 11 पर्यंत किंवा माल संपेपर्यंत चालू राहायचे. किंमत पण नाममात्र 5 रुपये होती... पण त्याकाळी ती पण जास्त भासायची... माझ्यासारख्या बरेच विद्यार्थ्यांना जिरा राईस म्हणजे हक्काचा आणि स्वस्त्यात मस्त नाश्ता... दोन प्लेट पोट भरून खा... अन दुपारपर्यंत बिनघोर रहा...
गंजगोलाई ही लातूरमधली मुख्य बाजारपेठ आणि व्यापारीपेठ... असंख्य हमाली मजूर आणि कामगार तिथे अगदी सकाळीच दुपारच्या जेवणाचे डब्बे घेऊन आपापल्या कामासाठी दाखल होतं... त्यांच्या तुटपुंज्या मजुरीच्या प्रमाणात सकाळचा जिरा राईस म्हणजे त्यांच्या पोटासाठी पर्वणीच होती... कारण पोटही भरायचं आणि मनही तृप्त व्हायचं... राईस खाऊन दुपारपर्यंतच्या कामाची एनर्जी घेऊन हे हमाल संतृप्त होऊन आपल्या कामाला लागायचे...
मी ज्या गाड्यावर राईस खायला जायचो... तो तांबोळी चिचाचा गाडा मात्र डॉट 6:50 ला सुरु व्हायचा... मग काय सकाळी कॉलेजसाठी रेडी होऊन... थेट आपली स्वारी गाड्यावर हजर व्हायची... पण कॉलेजचा टाइम सातचाचं होता... मग काय गप-गप दोन प्लेट राईस खाऊन... थेट वर्गात हजर व्हायचं... पण 7 वाजून 10 मिनिटाला... आणि तोपर्यंत हजेरी संपून जायची... जिरा राईसच्या नादात रोज डॉ. रवी धोटे मास्तरचा नाहीतर प्रमिला मॅडमचा रोष ओढवून घेण्याची मला सवयच झाली होती... बऱ्याच वेळा त्यांच्या मागे लागू लागू हजेरी लावून घेतली... काही दिवसानंतर त्यांनाही माझ्या ह्या सवयीची आदत झाली... Period झाल्यावर बाहेर आलं की प्रमिला मॅडम त्यांच्या टिपिकल स्टाईल मध्ये "रोल नंबर 45... हा जाव जाव... डाल देती प्रेसेन्टी..." म्हणून न ऐकताच निघून जायच्या... मनात धाकधूक राहायची... पण त्यांनी शेवटपर्यंत कधी अबसेन्टी लावली नाही... डॉ. रवी धोटे सर तर हमेशा म्हणायचे... "हा भाई... आगया तू... डालदू प्रेसेन्टी... पर तू कभी सुधरेगा नही... हैं ना...!?" शेवटपर्यंत मी कोणालाच लेट होण्याचं कारण नाही सांगितलं... त्यांना सांगून उगाच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार होतो म्हणा मी...! आता तुम्ही म्हणाल प्रेसेन्टीचा एवढा बाऊ कशासाठी... तर आम्हाला तेंव्हा शाहू कॉलेज मध्ये अबसेन्टी पडली की विस रुपये फाईन बसायचा... अन तेवढा फाईन भरायचा म्हणजे दोन दिवसाच्या जिरा राईसचं नुकसान... नाही का...!?
हे तर झालं नाश्त्याच... पण मग दुपारच्या जेवणाचं काय...! त्यासाठी अक्षरशा इडलीचा वरवा लावला होता मी... हास्यास्पद आहे... पण मजेशीर सुद्धा...
एका वर्षानंतर 12 वी सुरु झाल्यावर मी गंजगोलाई सोडून उद्योग भवन एरियात रूम करून राहायला गेलो... त्यामुळे सकाळी 7 चा नाश्ता करणं जवळपास बंद झाल होतं... सकाळी दहा-सव्वादहाच्या सुमारास कॉलेजची इंटरवल व्हायची... आणि त्या इंटरवलं मध्ये मी रोज जाऊन गांधी चौकातली इडली खायचो... आणि त्या एक प्लेट इडली मध्ये माझा नाश्ता आणि जेवण दोन्ही व्हायचं...
गांधी चौकात इडलीच्या तीन गाड्या होत्या ... सर्व बंड्या गवळ्यांच्याच होत्या... दोन महालक्ष्मी नावाची इडली सेंटर्स आणि एक गवळी इडली सेंटर... माझ्या आवडीचा गाडा म्हणजे गवळी इडली सेंटर... त्याच्या सांबर ची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत राहते... आजही आमच्या किनवटचं गायत्री इडली सेंटर सोडून दुसरीकडे कुठेही मी इडली खात नाही... इथली इडली अशी की जिभेवर ठेवली तरी क्षणात विरघळून जायची... माझ्यासाठी इडली, चटणी अन सांबर म्हणजे फक्त गवळी इडली सेंटर झालंय... गांधी चौकातली इडली म्हणजे माझ्यासाठी जणू इडलीचा मापदंड झालाय... "इडली असावी तर गांधी चौकातल्या गाड्यासारखी... नाहीतर नसावीच..." अशी काहीतरी जादू ह्यां गाड्यांवरच्या इडलीची आहे...!
एक प्लेट इडली, चटणी अन सांबर खाल्ला की माणूस तिकडंच... दिवसभर काही घोरच नाही... थेट रात्रीच मेसच जेवणचं खायचं मग... सांबारही पोटभरून पियायला मिळायचा... फक्त "हिशोबानं घ्या!" अशी एक प्रेमळ सक्तीची ताकीद सर्वांना असायची... ती पण फक्त अन्नाचा नासोडा होऊ नये म्हणून...! माझ्यासारखे अनेक शाहू अन बसवेश्वर कॉलेजचे विद्यार्थी तसेच सकाळी सकाळी लातूरमध्ये कामनिमित्त आलेले असंख्य कर्मचारी आणि रोजनदारीला आलेले अनेक मजूर... फक्त 15 रुपयात पोटभर इडल्या खाऊन तृप्त व्हायचे आणि दिवसभर आपापली कामं करायचे... हा नित्याचाच नियम गांधी चौकात होता...!
कालपासून जवळपास 10 वर्षांनी लातूरमध्ये आलोयं... बस स्टॅन्ड वर उतरल्यावर लगेच जिवलग मित्र सँड्यासोबत माझं शाहू कॉलेज गाठलं... पण आमचं अक्ख 11वी अन 12वीचं Science डिपार्टमेंट दुसरीकडे already शिफ्ट झालेलं... पण गेल्या गेल्या शाहू कॉलेजच्या आरोह तमसो ज्योती ह्या फिनिक्स पक्षांसोबत असलेल्या ब्रीदवाक्यावर नजर पडली... आणि मी ह्या कॅम्पसमध्ये घालवलेली अवघी 2 वर्षे डोळ्यासमोरून झर झर निघून गेली... सायकल स्टॅन्डवरील Security गार्ड काका आज कॉलेजचे Chief Security Guard झाले आहेत... पण तितक्यातच फिजिक्स डिपार्टमेंटला गेल्यावर आमच्या प्रॅक्टिकलला असणाऱ्या एका काकांना मी ओळखलं... त्यांना मी कोण आहे हे सांगितल्यावर आपुलकीने ते आम्हाला चहा प्यायला घेऊन गेले... माझ्यासाठी तो फार भावुक करणारा क्षण होता...!
आज गांधी चौकातल्या इडलीच्या गाड्यावर गेलो होतो... महालक्ष्मीवाल्या सिद्धू भाऊंनी आणि गवळी काकांनी आपुलकीने विचारपूस करून फोटो काढून मागवून घेतलेत... गवळी इडली सेंटरच्या काकांनी अभिमानाने आणि त्याचं प्रेमाने सांबर वाढला आणि सोबत एक फोटो पण घेतला... गंजगोलाईतल्या जिरा राईसच्या गाड्यावरील तांबोळी चिचा नाही भेटले... पण त्यांचा मुलगा होता... ते कुठेतरी दौऱ्यावर गेले होते... पण दोन्हीकडे आजही तीच टेस्ट बरकरार आहे आणि गर्दी सुद्धा... आजही कित्येक विद्यार्थी, कर्मचारी आणि रोजमजूर मन आणि पोट दोन्ही तृप्त करून आपापली कामे करत आहेत...
मी सुद्धा आज 10 वर्षांनी मनसोक्त इडली-चटणी-सांबर अन जिरा राईस खाऊन अन संतृप्त होऊन लातूरच्या सर्व सर्व जुन्या आणि नवीन आठवणी डोळ्यात आणि मनात साठवून परत वर्धेला आपल्या ड्युटीसाठी निघत आहे... परत कधीतरी लातूरला पुन्हा येण्याच्या आशेसोबत...! ✨️
#हे लातूर हायं... पिल्लू... 💞
#Latur Diaries 💥
© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील
M.B.B.S., M.D. (Community Medicine)
दि. ०२/०२/२०२३
👌
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteAraa raa raa ....ghavlay bagga porga khup ghavlay
ReplyDeleteEk no.sir
ReplyDeleteLatur madil ajun kahi tari athvani visarlas aass vatat nahi ka...😜
ReplyDeleteभारीच अनुभव सर
ReplyDelete🔥🔥🔥🔥
ReplyDeleteGobya ektach gelas .....mast mast
ReplyDeleteखूप छान आठवणी आहेत.... पणू......
ReplyDeletePranit 👌❤️
ReplyDeleteBhari..na bhava...
ReplyDeleteShahu college chi aathvan ali ...wachun ..kuhp diwsanantr...