शिवशक्ती आणि भिमशक्ती
"शिवशक्ती आणि भिमशक्ती: महार(बौद्ध/नवबौध्द) व मराठा(कुणबी) समाजातील अंतर कायम ठेवून ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारी कावेबाज संकल्पना"
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा व गैरमराठा खास करून महार समाजाचा किंवा शेड्युलकास्टचा नेता एकत्र आला की शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली असे म्हणण्याचा मूर्खपणा सर्रास चालु आहे. यामध्ये शिवशक्तीचा प्रतिनिधी मराठा नेता असतो व महार समाजाचा (शेड्युलकास्टचा) नेता भिमशक्तीचा प्रतिनिधी असतो. हा माहोल असा काही रंगवला जातो की पाहणाऱ्यास असे वाटते किंवा पटवून दिल्या जाते कि छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त मराठा लोकांसाठी फक्त मराठा लोकच बरोबर घेऊन काम केले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शेड्युलकास्टसाठी फक्त शेड्युलकास्टचेच लोक बरोबर घेऊन काम केले होते.
एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे स्वराज्य निर्माण केले होते आणि बाबासाहेबांनी सर्वच भारतीयांसाठी संविधान लिहिले होते असे ओरडून सांगणारे पण या वातावरणात दिसेनासे होतात. हे सर्व पाहून एक भिषण प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे शिवशक्ती व भीमशक्ती मधे विभागलेला महाराष्ट्र फुले - शाहु - आंबेडकरांचा वैचारिक वारसा पेलविण्यास सक्षम आहे का किंवा असेल का?
माणगावच्या ऐतिहासिक परिषदेमध्ये राजर्षी शाहु महाराज बाबासाहेब आंबेडकरांबद्दल म्हणाले होते की "एक दिवस आंबेडकर या देशाचे लोकमान्य नेते होतील".
आमच्या राजर्षी शाहु व बाबासाहेबांचे रक्ताचे तसेच वैचारिकही वारस म्हणविणाऱ्या कपाळकरंट्यानी त्याच शाहु व बाबासाहेबांना शिवशक्ती व भीमशक्ती मधे वाटून टाकले. आता या महाभागांना हे कोण सांगणार की अस्पृश्यांसाठी केलेल्या कामाबद्दल शाहुंनी कधी मतं मागितली नाहीत. शाहुंचा व बाबासाहेबांचा वारस होणे एवढे सोपे नाही कारण त्या दोघांचा वारस होण्याआधी तुम्हाला महात्मा जोतिबा फुल्यांचे वारस व्हावे लागते. बाबासाहेब फुलेंना आपला गुरु मानतात व कुणबी-मराठा जातीला फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा सर्वात मोठा वारसा मिळाला होता, ही गोष्ट शिवशक्ती - भीमशक्ती करणाऱ्या टाळक्यांना माहीत नाही काय?
ते महात्मा फुलेच आहेत ज्यांनी मराठा व गैरमराठा(SC/ST/OBC) यांना एकत्रित आणले होते. त्यामुळे मराठा व गैरमराठा यांच्यात अंतर पाडण्यासाठी फुले-शाहु-आंबेडकर यांतून फुलेंना जाणूनबुजून डावलले जाते आणि मग शिवशक्ती-भिमशक्ती करायला सोपं जात. महाराष्ट्रातील आजपर्यंतचा इतिहास आहे की महाराष्ट्रात ब्राह्मण व ब्राह्मणवादी केवळ एकाच गोष्टीमुळे सफल झाले आहेत, ते म्हणजे मराठा व गैरमराठा यांच्यातली दरी सततची वाढवती ठेऊन आणि वेळोवेळी त्याला खतपाणी घालून तसेच प्रत्येकवेळी ही दरी कायम ठेवणारे बाहुले उभे करून!
कुणबी-मराठा, ओबीसी, एस. सी., एस. टी., एकच आहेत आणि त्यांच्यामध्ये खुप साम्य आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. अशी कित्येक आडनावे आहेत जी या सर्वांमध्ये सापडतील. उदा. पाटील, पवार, जाधव, सूर्यवंशी, इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना 'मावळा' या एकाच संकल्पनेखाली जोडून रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली. पुढे महात्मा जोतिबा फुल्यांनी सत्यशोधक या नावाखाली सर्वांना जोडले. हाच वारसा राजर्षी शाहुंनी चालवत सर्वांना गैरब्राह्मण या नावाखाली एकत्र जोडले! हाच वारसा पुढे चालवत बाबासाहेबांनी संविधानात सर्व जातींना संविधानिक अधिकार देण्यासाठी फक्त तीन प्रवर्गात (SC/ST/OBC) एकत्र आणले.
छत्रपती ते बाबासाहेब या सर्व महापुरुषांनी या ना त्या नावाखाली सर्व बहुजन समाजाला एकाच छताखाली आणण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. पण या महापुरुषांनी कधीही आपल्या नावाखाली समाज वाटून घेतला नाही.
राजर्षी शाहु महाराज व बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन! दोघांचाही एकमेकांप्रतीचा जिव्हाळा समस्त देशाला माहिती आहे. या दोघांनी उभ्या आयुष्यात कधीही समाजाची वाटणी करण्याचा साधा विचारसुद्धा केला नाही, तर मग त्यांचे नियतीमुळे किंवा दैवयोगाने फक्त आडनावाचे वारस बनलेले संभाजी भोसले व प्रकाश आंबेडकर हे शिवशक्ती व भिमशक्तीच्या नावाखाली समाजाला वाटून घेणारे कोण?
या दैवयोगाने वारस बनलेल्या दोघांचेही वर्तन शाहु-आंबेडकरांना धरून आहे का? समाजासाठी प्रसंगी राजपद सोडायला तयार असणारे राजर्षी कुठे आणि भाजपच्या खासदारकीला चिकटलेले संभाजी भोसले कुठे? आयुष्याच्या शेवटपर्यंत पुणे कराराला विरोध करणारे बाबासाहेब कुठे आणि पुणे कराराचे समर्थन करणारे प्रकाश आंबेडकर कुठे? या दोघांनाही शाहु-आंबेडकरांचे वारसपण आतापर्यंत झेपलेले नाही आणि पुढेही झेपेल याची सुतराम शक्यता दिसत नाही. ह्याचे कारण असे की काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर ह्यांनी मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असेल तर ते आर्थिक निकषाला आधार बनवून दिले पाहिजे असे वक्तव्य केले होते! जर हे असे असेल तर प्रकाश आंबेडकरांचा पिंडच मुळात संवैधानिक आरक्षण विरोधी आहे असे निदर्शनास येते! त्यामुळे ते जर आरक्षणाच्या मुद्द्याला आधार बनवून कुणबी-मराठा समाजाला जर जवळ करत असतील तर ते फक्त मराठा समाजाला गाजर दाखवण्याचे काम करत आहेत! आणि ही गोष्ट ते कोणाच्या ईशाऱ्यावर करत आहेत हे देखील पाहणे महत्वाचे आहे कारण वंचित बहुजन आघाडीवर ह्यापूर्वी सुद्धा भाजपची B-Team म्हणून आरोप लागलेले आहेत.
तसेच 102 वी घटनादुरुस्ती जिच्यामुळे एखादी जात मागासप्रवर्गात टाकण्याचे राज्याचे अधिकार हिरावून घेतले जाणार होते, त्या घटनादुरुस्तीच्या बहुमत चाचणीला खासदार म्हणून संभाजी भोसलेंनी घटनादुरुस्तीच्या बाजूनेच मतदान केलेले आहे. मग आता जर मराठा जातीला आरक्षण मिळावे आणि तेही ओबीसी म्हणूनच मिळावे असे जर संभाजी भोसलेंना वाटत असेल तर त्यांनी दोन भूमिका घ्यायला पाहिजे होत्या. एक तर 102 व्या घटनादुरुस्तीला विरोध करणे आणि दुसरे मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करणे. परंतु संभाजी भोसले असे करताना बिलकुल दिसत नाहीत. त्यामुळे एकतर त्यांची सध्याची भूमिका संशयास्पद वाटते आणि त्याबरोबरच ते दुसऱ्या कोणाच्या तरी ईशाऱ्यावर काम करत असल्याचा संशय देखील बळावतो.
त्यामुळे बहुजन समाजाने या असल्या केवळ दैवयोगाने बनलेल्या वारसांपासून स्वतःला सावध केले पाहिजे, अन्यथा हे लोकं फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र कधी शिवशक्ती-भिमशक्ती मधे वाटून टाकतील कळणारही नाही. त्यामुळे समस्त महार आणि कुणबी-मराठा तसेच (SC/ST/OBC) बांधवानी फक्त आणि फक्त बहुजन संकल्पनेखाली एकत्र आले पाहिजे व सर्वांमधील मैत्री मजबूत व अबाधित ठेवली पाहिजे. शाहू महाराज व बाबासाहेब ह्यांच्यातील मैत्री हीच आदर्श मैत्री होती. कारण ह्या मैत्रीमध्ये कोण्या एका जातीचे हित सामावलेले नव्हते. तर समस्त बहुजन समाजाच्या हितासाठी ही मैत्री काम करत होती.
परंतु स्वतःला राजर्षी शाहू व बाबासाहेबांचे वारस म्हणविणाऱ्या संभाजी भोसले व प्रकाश आंबेडकर ह्यांच्या सध्याच्या भूमिकेत ह्या मैत्रीचा लवलेशही दिसत नाही. उलटपक्षी राजकीय स्वार्थचं दिसतो. आणि ह्या स्वार्थाला साधण्यासाठी दोघेही आम्हीच कसे महार व मराठ्यांचे मालक असल्यासारखेच वागत आहेत आणि शिवशक्ती-भिमशक्तीच्या नावाखाली महार व मराठा समाजाला वाटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे बहुजन संकल्पनेला तडा जात आहे. त्यामुळे समाज विभागणारी कोणतीही संकल्पना व त्या संकल्पनेच्या निर्मात्यांना जागीच थंड केले पाहीजे, अन्यथा अनर्थ अटळ आहे...!
तसेच #मराठाआरक्षणचे समर्थन करणाऱ्या सर्व बहुजन समाजाला हे कळकळीचे सांगणे आहे कि टोकाची आणि आरक्षणविरोधी भूमिका घेणारे लोक दोन्हीकडे आहेत. उदाहरणार्थ, मराठा आरक्षण विरोध याचिका दाखल करणारा जातीग्रस्त मनोरुग्ण गुणरतन सदावर्ते तसेच पदोन्नतीमध्ये बहुजन समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे जातीग्रस्त विषारी मानसिकतेचे मराठा क्रांती मोर्चाचे काही महाभाग...! ह्या अशा अँटी-सोशल किड्यांमुळे बहुजन समाजात महार विरुद्ध मराठा असे वातावरण निर्माण होते! "आम्हाला नाही तर कोणालाच नाही" ही मानसिकता तर सर्व समाजाला खड्ड्यात घेऊन जाईल...! त्यामुळे अशा विषारी #AntiSocial महाभागांना समाजापुढे उघडे करणे आणि सर्व संविधानसमर्थक बहुजन समाज एकत्र आणणे हाच एक पर्याय आता आपल्यापुढे उरतो...!
त्यामुळे शिवशक्ती आणि भिमशक्ती ह्या दोन वेगळ्या शक्त्या नाहीत तर मुळात एकच बहुजनशक्ती आहे, हे लक्षात घेणे आणि एकमेकांसोबत एकमेकांसाठी मैत्रीपूर्ण सहकार्य करणे ही काळाची गरज आहे...! तर आणि तरच शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या दृष्टीतील प्रगल्भ महाराष्ट्राचे आणि प्रबुद्ध व संवैधानिक भारताचे स्वप्न पूर्ण होईल...!
जय शिवराय!!! जय भिम!!!
दि. ०३/०६/२०२१
© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील
M.B.B.S., M.D. (Community Medicine)
Chan
ReplyDeleteसत्य सर❤🙏
ReplyDeleteभाई संगारे यांची आठवण आली सर हा लेख वाचून
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteVery well written.
ReplyDeleteLoved this post Bhai 👍🏻
अतिशय सुंदर लेख 👌👌👌
ReplyDeleteKhup Satya aahe ani khup marmik aahe sir
ReplyDeleteTu lihatoyas te Satya ahe..Shiva Shakti Bheemshakti Na manataa....Akhand Shiva phule shahu Ambedkar shakati...asse sambodhane khup kahi changla rahil.....vastustithi lihat ahes ...best luck pranit
ReplyDeleteखुप छान
Delete👌👌👌
ReplyDeleteKhup sundar ani mahitipurn lekh sir
ReplyDeleteपण शिवशक्ति आणि भीमशक्ति ही एकच बहुजनशक्ति आहे है समजून घेणे महार आणि मराठ्यांना शक्यच नाही आणि झाले तरी पॉलिटिक्स है होऊ देणार नाही
ReplyDeleteखुप छान लेख 👌
ReplyDeleteखुप छान लेख 👌👌👌
ReplyDelete