गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो पेटून उठेल...!
"गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल...!"
#डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेबांनी जनता नावाचे पाक्षिक सुरू केले होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला होता. त्याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे जनता पाक्षिकाचे संपादक झाले. जनता पाक्षिकाचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला 'जनता साप्ताहिक' झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून "गुलामाला 'तु गुलाम आहेस' असे सांगा; म्हणजे तो बंड करून उठेल" हे वाक्य होते.
"आये मम्मे... हे काय आहे गं...? हे बघ ह्याच्यात काय लिहिलं...? तू शूद्र आहेस म्हणून लिहिलं...!"
'बह्याड' आहेस का गं...! काही पण बोलतं का? कुठे लिहिलं दाखव...?
हे बघ...! हा... हा... हा... हा...!!!
माय... हालकट कुठंच कि ते बामन... काही पण लिहिते की...? आपल्याच घरी येत जात राहते... खाते पिते अन् असं लिहिते की माझ्या कुंडलीत...?
आन इकडे ती कुंडली...! असं म्हणून माझ्या मम्मीने ती कुंडली टर्र टर्र फाडली... आणि माझ्या डोळ्यासमोरचं जाळून देखील टाकली...!
एके दिवशी आम्ही घरात साफसफाई करत असताना घडलेला हा वरील प्रसंग...!
माझ्या घरी कुंडली काढण्याचा प्रसंग तसा दुरापास्तच... कारण माझ्या पप्पाना हे असलं थोतांड आधीच पटत नाही. पण माझ्या आईने पप्पांच्या नकळत माझ्या मम्मीची कुंडली एका बामनांकडून काढून घेतली होती. माझ्या आजीला मी 'आई' म्हणायची. मग मी मम्मीला सविस्तर विचारल्यावर ती सांगत होती की एकदा मी नगरसेविकेच्या स्थानिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. तेंव्हा माझ्या निवडणुकीत जिंकण्याचे काही योग आहेत का हे बघण्यासाठी तुझ्या आजीने माझ्याही नकळत बामनाकडून ही कुंडली काढून घेतली होती. नंतर मला कळालं पण मी ह्याकडे काही एवढ लक्ष दिल नाही. ह्यातलं काहीही तुझ्या पप्पांना पण सांगितलं नाही.
पण काहीही असलं तरी "ते हलकट बामन असं लिहिते की...? काही अक्कल आहे का त्याला...? शूद्र आहे का मी...?"
माझ्या मम्मीच्या समजेनुसार शूद्र म्हणजे Scheduled Caste (SC)...! पण SC म्हणजे पूर्वीच्या अतिशूद्र किंवा अस्पृश्य जाती आणि शूद्र म्हणजे ढोबळमानाने पूर्वीच्या OBC जाती...!
असो...
पण इथे तिला राग येण्याचं कारण म्हणजे आम्ही जातीने न्हावी असून सुद्धा तिचा उल्लेख एका बामणाने खालच्या जातीची असा केला.
खरंय...
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो पेटून उठेल...!
ह्याठिकाणी मी "पेटून उठेल" हा वाक्यप्रयोग मुद्दामचं केला. कारण बंड करून उठायला ती कोणी ACTIVIST किंवा सक्रिय सामाजिक/राजकीय कार्यकर्ती नव्हती. ती साधारण गृहिणी आहे. गुलाम, शूद्र, गुलामी हे शब्द तिला दुरापास्तच...! पण ज्यापद्धतीने पेटून उठून तीनी कुंडली जाळून टाकली... हे वाखाणण्याजोगेच आहे...!
"ढोल, गवार, शूद्र, पशु और नारी (स्त्री) सकल ताडन के अधिकारी...!"
तुलसीदासरचित रामचरितमानस मधील उपरोक्त संदर्भित ओळीनुसार म्हणजेच ब्राह्मणी धर्मग्रंथांनुसार स्त्रिया आणि शूद्र हे गुलामच आहेत आणि फक्त शिक्षेस/दंडास पात्र आहेत.
महात्मा जोतीराव फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ इ.स. १८७३ साली लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रथमावृत्तीच्या मुखपृष्ठावर असे नमूद केले आहे कि, हा ग्रंथ सुधारलेल्या इंग्लिश राज्यात, ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात जोतीराव गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केला.
तसेच ह्या ग्रंथाच्या प्रथमावृत्तीच्या अर्पण पत्रिकेत जोतिबा लिहितात, ''युनाइटेड स्टेट्स (अमेरिका) मधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत औदार्य, निरापेक्षता, व परोपकार बुद्धी दाखविली यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यांस परम प्रितीने नजर करितो, आणि माझे देश बांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपले शूद्र बांधवांस ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी अशा बाळगतो."
म्हणूनच गुलामगिरी ग्रंथाच्या ह्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे महात्मा फुलेंचे आपणास हेच सांगणे आहे कि आपण आपल्या शूद्र आणि अतिशूद्र बांधवांस त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून ते पेटून उठतील. तसेच त्यांना ब्राह्मणी धर्माच्या व धर्म ग्रंथांच्या गुलामीतून किंवा दास्यत्वातून मुक्त होण्यास आपण कारणीभूत झाले पाहिजे. आणि हे कार्य आपण सर्व बहुजनांनी मिळून निरपेक्ष व परोपकार बुद्धीने केले पाहिजे.
ह्याचाच वैचारिक प्रत्यंतर म्हणून कि काय घरातल्या इतर देव कार्यात आणि माझ्या लग्नाच्यावेळेस (आंतरजातीय विवाह) सुद्धा ती बामन, कुंडली आणि सत्यनारायण ह्या भानगडीत देखील पडली नाही...! ब्राह्मणी धार्मिक व्यवस्थेविरोधात हा एकप्रकारचा विद्रोहचं होता. आणि ह्याचाच परिणाम म्हणून कि काय मी आजदेखील कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणी कर्मकांडात व अवडंबरात पडत नाही.
...आणि कळत-नकळत मी सुद्धा बुद्ध-शिव-फुले-शाहू-पेरियार-आंबेडकरी विचारधारा जपण्याचा आणि त्यावर चालण्याचा माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रयत्न करत असते.
जय जोती...! जय सावित्री...!
© अपुर्वा संगिता विजय पोलासवार
B.Sc. Agriculture
शब्दांकन:
डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील
M.B.B.S., M.D. (Community Medicine)
दि. ०३/०९/२०२२
छान विचार मांडले 👍👌👌👌
ReplyDeleteखुप छान विचार लिहिले 👌👌
ReplyDeleteअप्रतिम...सुंदर👌
ReplyDeleteअप्रतीम सर
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete👍
ReplyDelete👍🔥
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteखूपच छान लिखाण
ReplyDeleteअसल्या रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीत जातीवाद शोधून देणं खूप महत्त्वाचं आहे
मस्त लिहले आहे विदर्भकर( नांदेडकर)
ReplyDeleteखूप छान 👌👌 अप्रतिम लिहलंय
ReplyDelete