Choose your Lady Wisely; She represents you! ('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)

 Choose your Lady Wisely; She represents you!💞

('व्हॅलेन्टाईन डे' च्या निमित्ताने...)


एक साधारण कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्ती बराक ओबामा जेंव्हा पहिल्यांदा संयुक्त राज्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते...

तेंव्हा संयुक्त राज्य अमेरिकेच्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्या पत्नी मिशेल ओबामांचा त्यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध होत होता.

आणि त्या फोटोसोबत एक वाक्य देखील सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये लिहून येत होते:

Choose your Lady Wisely; She represents you!

खरंय...!

अपूर्वासोबत लग्नानंतर लगेच ह्या गोष्टीची अनुभूती मला झाली...!

पण त्यापूर्वी मला ह्या वाक्याबद्दल फक्त थोडीफार समज होती कारण आमचा प्रेमविवाह!!! तोही आंतरजातीय! आणि एकदा ठोकर लागल्यावर तर माणूस ताकसुद्धा फुकून पीत असतो म्हणे!

म्हणून लगेच वाचकाने ह्या लेखाच्या शिर्षकाचा अर्थ नकारात्मक घेऊ नये! नाहीतर आमच्या घरात भांडे वाजायला काही उशीर नाही!

आणि तशी भांडी वाजायला पण हवीत म्हणा कारण ते म्हणतात ना "तुझं-माझं जमेना...अन तुझ्या वाचून करमेना!"

असो...

अपुर्वा संगिता विजय पोलासवार म्हणजेच माझी अप्पू...! माझी हमसफर...! माझी लग्नाची वाइफ आणि वेडींगची बायको...! माय लेडी...! 💙


आमचा आंतरजातीय प्रेमविवाह! म्हणून फार त्रास झाला किंवा खूप सहन करावे लागले म्हणून हा लेखन प्रपंच वगैरे मुळीच नाही!

तोदेखील तसा कळीचा मुद्दा आहेच म्हणा! पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी...

पण लगेच शिर्षकाकडे बघून असे मुळीच वाटू देऊ नये कि मी फार मोठा तीर मारला वगैरे!

तसाही आंतरजातीय प्रेमविवाह हादेखील हवेतील तीर अंगावर घेण्याचा एक प्रकारचं आहे म्हणा...!


मी असं का म्हणतोय कारण लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा म्हणजेच टर्निंग पॉईंट! आणि इथे जर गल्लत झाली तर पूर्ण आयुष्याचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजा!

असे अनेक प्रसंग सापडतील कि लग्नाची बायको किंवा जोडीदार निवडण्याच्या निर्णय चुकला की पुढचं संपूर्ण आयुष्यच चुकत जातं...!

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही पण सर्व माहिती असताना विषाची परीक्षा कशाला करायची?

तरीदेखील लोक चुकतात! मीही आयुष्याच्या भूतकाळात ह्या गोष्टीला कुठं अपवाद होतो म्हणा? कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही!

पण योगायोग म्हणा किंवा नियती... मला स्वतःला सुधारण्यासाठी आत्महत्येच्या प्रयत्नांची गरज वगैरे मुळीच पडली नाही!

कारण योग्य वेळेस मला माझी अप्पू भेटली होती...! एक समंजस्य जोडीदार भेटली होती...!


असं म्हणतात कि कोणताही पुरुष आयुष्याचा जोडीदार पाहताना तिच्यामध्ये आपल्या आईला किंवा बहिणीला शोधण्याचा प्रयत्न करतो! मला दोघीही तिच्यामध्येच भेटल्या! ते पण न शोधता! 


रामचरण ह्या तेलगू अभिनेत्याच्या "येवडू" या चित्रपटात एक फार सुंदर दृश्य आहे... त्यामध्ये तो त्याच्या आईला म्हणतो कि... "आई, मला हे माहिती नाही कि तुला बघितल्यावर मला तिची आठवण येते कि नाही! पण तिच्यासोबत असल्यावर मला प्रत्येकवेळेस तुझी आठवण येते...!"


माझही थोडफार तसच आहे... असं म्हणायला हरकत नाही! म्हणूनच कि काय की मम्मी-पप्पांची मला वाटणारी काळजी ती सहज दूर करत असेल! पण मम्मी-पप्पाना थोडं जरी काही झालं तर माझ्याआधी तिचे डोळे अश्रूला वाट मोकळी करून देतात! म्हणून मला ह्याचं प्रत्येकवेळी समाधान असत कि माझ्या आई-वडिलांना सून नाही तर एक स्वतःची मुलगी भेटली! अगदी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे...!


बुद्ध-शिव-फुले-शाहू-पेरियार-आंबेडकरांचा एक अनुयायी असल्यामुळे मीही तशाच समविचारी जोडीदाराच्या शोधात होतो. तो जोडीदारदेखील मला कोणतेही उपद्व्याप न करताच मिळाला! कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचेच! असे म्हणणाऱ्या, माझ्या जातीमध्ये मला अशी जोडीदार भेटणं नक्कीच अवघड गेलं असत! आणि भूतकाळ तर म्हणायला आपण मागे सोडलेला असतो... पण तो काही आपला पिच्छा सोडत नाही! आणि तशीही अशा जोडीदार शोधाची देखील एक आठवण आयुष्यभर सोबत राहणार आहेच म्हणा...!

इतकेच काय "फुले-आंबेडकरांचा खरा अनुयायी होण्यासाठी म्हणून मी जे काही प्रयत्न करतो ह्यासदेखील तीच कारणीभूत आहे," असे म्हणायला मला बिलकुल अडचण नाही!

माझा आत्तापर्यंत असा समज होता कि माझ्यात आज जे काही सद्गुण आहेत ते फक्त आणि फक्त फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानण्यामुळे आहेत! आणि ह्यात काही शंकाही नाही! पण हेदेखील तितकेच खरे आहे कि माझ्यात आजपर्यंत दुर्गुणांचा शिरकाव न होण्यास फक्त आणि फक्त तीच कारणीभूत आहे! कारण नुसत्या सिद्धांतावर माणूस आपले आयुष्य जगू शकत नाही... मैत्री नावाची भावना देखील त्याला आप्तेष्टांकडून लागते... आणि बायको आणि मैत्रीण एकाच व्यक्तीत भेटणं हा दुग्धशर्करा योग माझ्या आयुष्यात फक्त तिच्यामुळेच आला!


ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला "सावित्रीआई आणि रमाईचं" एकत्रच प्रतिरूप अंशतः का होईना पण पाहायला मिळालं आणि मिळतंय देखील! आणि ती काही काळानंतर जिजाऊंच्या देखील पाउलांवर चालेल, ह्यात मला तिळमात्र शंका नाही!


आतापर्यंत काही लेख वगैरे लिहिण्याचा आणि माझा संबंध तसा दुरापास्तच होता! बऱ्याच गोष्टी माझ्या लेखणीच्या टोकापाशी होत्या पण त्या कागदावर कधी उतरल्याचं नव्हत्या...! आज माझ्या ह्या भावनांना मी वाट मोकळी करून देतोय ती देखील केवळ तिच्यामुळेच! कारण ह्या नवीन गोष्टीची सुरुवात करण्यास तिचंच प्रोत्साहन होतं!


समजूतदारपणाच्या बाबतीत मी तिच्या पासंगालाही पुरणार नाही! म्हणूनच कि काय मी आजदेखील तिच्याकडून समजूतदारपणा शिकतोय! आणि शिकतच राहील...!

होय अप्पू... आज मी ही गोष्ट सर्वांसमोर कबुल करतो कि खरंच तू फार समजूतदार आहेस...!


ह्या लेखाच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय... कि मीसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतो! अगदी ढगाएवढं...!

पण कदाचित तिच्याएवढं नाही...!

हो...!!! ती माझ्यावर जेवढ प्रेम करते तेवढ मी तरी सध्या नाही करत तिच्यावर! अशक्यप्राय आहे ते!!!

पण ह्यापुढे नक्कीच मी "जशास तसे" देण्याचा अगदी  १०० टक्के प्रयत्न करेल! बघूया जमलं तर! आणि तसं तिलाही अगदी चांगल्याप्रकारे माहिती आहे कि मला किती आणि कसं जमत ते?

अप्पू तूर्तास तुझ्यासाठी माझं एवढंच सांगणं...

"और नही कुछ तुमसे कहना...जीवनसाथी... जीवनसाथी... जीवनसाथी... साथही रहना...!"💖


खरंच... ह्या लेखाचे शिर्षक आज माझ्या आयुष्याच्या बाबतीत अगदी समर्पक ठरलं आहे!

...And I have chosen My Lady Wisely!


दि. १०/०२/२०२१ 


© डॉ. प्रणित उर्मिला संजय पाटील

M.B.B.S., M.D. (Community Medicine)

Comments

  1. As u always wanted ....someone perfect lady ....and u got one...I wish u happy life with u r lady ahead...

    ReplyDelete
  2. Khup jast shikhayla milala sir tumcha kadun aj...

    ReplyDelete
  3. आमचा डॉक्टर लई भारी. मनानं अणि विचारांनी पण. खुप सुंदर पणू

    ReplyDelete
  4. मोकळी वाट शब्दांची
    जोडी जगी भारी प्रणितसर संगे अपुर्वा वहिनीची
    मंगल परिणय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा❤🥳🥳🌹🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  5. Dogha pan asach Happy Raha..Likhan Chan ahe lihat ja.

    ReplyDelete
  6. अप्रतिम मित्रा

    ReplyDelete

Post a Comment